प्रकाशदूत

धुळ्यात डॉ. तुषार शेवाळेंच्या

रूपाने तिसर्‍या पर्यायाची चर्चा

प्रकाशदूत
दाभाडी : नीलेश शिंपी
     धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे नाराज झाले. त्यांनी पदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली. मात्र, ही नाराजी राजीनाम्यापुरती मर्यादित नसून ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. डॉ. शेवाळे यांच्या रूपाने धुळ्यात तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली गतिमान झाल्यास याचा फटका काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना बसण्याची शक्यता आहे
     भौगोलिकदृष्ट्या धुळे लोकसभा मतदारसंघ मोठा आहे. धुळे जिल्ह्यात धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या तीन विधानसभा मतदारसंघाचा तर नाशिक जिल्ह्यात मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन मतदारसंघांचा समावेश होतो. यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन विधानसभा मतदारसंघ नेहमीच किंगमेकरची भूमिका निभावत आले आहेत. गेल्या तीन निवडणुकीपासून दोन्ही पक्षांचे प्रमुख उमेदवार धुळे जिल्ह्यातीलच राहिले आहेत. यावेळी ‘कसमादे’चा उमेदवार उभा राहिल्यास निवडणुकीची समीकरणे बदलू शकतील अशी जनमानसात चर्चा आहे.

  Published from Blogger Prime Android App
     महाविकास आघाडीत धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेस पक्षाने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथून इच्छुक असलेले पक्षाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे व धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर नाराज झाले. स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरील उमेदवार दिल्याचा आरोप करीत दोघांनी आपापल्या पदांचे राजीनामा देत नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे पक्षाने डॉ. बच्छाव यांना उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच डॉ. बच्छाव यांना तीव्र विरोध झाला. मालेगाव काँग्रेस कमिटी कार्यालयात डॉ. बच्छाव आल्या असता डॉ. शेवाळे समर्थकांनी घोषणाबाजी करून त्यांना परतून लावले. डॉ. शेवाळे हे निष्ठावंत कार्यकर्ता असूनही पक्षाने अन्याय केल्याची त्यांच्या समर्थकांची भावना झाली आहे. त्यामुळे डॉ. शेवाळे समर्थकांनी त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. या संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पोस्ट व्हायरल होत आहे. डॉ. शेवाळे यांना धुळ्यातूनही पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच माजी आमदार अनिल गोटे व श्याम सनेर यांनी तिसरा पर्यायी उमेदवार देण्याची चाचपणी केली आहे. त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही, पण शेवाळेंना आग्रह हा त्याचाच भाग असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे डॉ. शेवाळे अपक्ष उमेदवारी करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉ. शेवाळे धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मतदारसंघाबाहेरील उमेदवार लादण्यात आल्याची भावना डॉ. शेवाळे व सनेर यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकजण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत