प्रकाशदूत

धुळे मतदार संघात डॉ. सुभाष भामरे व डॉ. शोभा बच्छाव यांना पक्षांतर्गत विरोध

महायुती व महाविकास आघाडीत सर्वच आलबेल नसल्याचे चित्र

प्रकाशदूत
दाभाडी : नीलेश शिंपी
धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना छुप्या पध्दतीने तर महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उघड पक्षांतर्गत विरोध होत आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना पक्षांतर्गत गटबाजी शमविण्याबरोबरच सक्षम प्रचार यंत्रणा उभारण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. तर दुसरीकडे मित्र पक्षाची ही मनधरणी करण्याची वेळ उमेदवारांवर आल्यामुळे महायुती व महाविकास आघाडीत अद्यापपर्यंत तरी सर्वच आलबेल नसल्याचे चित्र आहे.

Published from Blogger Prime Android App

धुळे लोकसभा मतदार संघाची जागा महायुतीतील भाजपकडे तर महाविकास आघाडीची जागा काँग्रेस पक्षाकडे गेली आहे. वंचितने सेवानिवृत्त अधिकारी अब्दुल रहेमान यांना उमेदवारी दिली आहे. रहेमान सोडता डॉ. भामरे व डॉ. बच्छाव यांना पक्षांतर्गत विरोध झाला आहे. विद्यमान खासदार डॉ. भामरे यांना पहिल्या टप्प्यातच उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे भाजपाकडून लोकसभेसाठी इच्छुक असणार्‍याच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळेच खा. डॉ. भामरे यांच्या उमेदवारीला देखील विरोध झाला. असे असताना देखील या विरोधाला न जुमानता डॉ. भामरे हे गेल्या महिनाभरापासून मतदार संघात पायला भिंगरी लावून फिरत आहेत. डॉ. भामरेंना केलेला विरोध उघड नसला तरी तो बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला होता. धुळे व मालेगाव परिसरात भाजपचे तीन ते चार गट आहेत. अंतर्गत गटबाजीने ऐन लोकसभा निवडणुकीत डोके वर काढले आहे. उघडपणे कोणी बोलत नसले तरी खाजगीत मात्र एकमेकांची उणीदुणी काढली जात आहे. 
उमेदवारीसाठी इच्छुक असणारे ही डॉ. भामरेंच्या प्रचारापासून अंतर राखून आहेत. त्यामुळे डॉ. भामरे यांना स्वपक्षातूनच विरोध असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वपक्षातून असा विरोध असतानाच अद्यापपर्यंत मित्रपक्षाचे नेते व कार्यकर्तेदेखील कोठेही प्रचारात दिसत नसल्याने महायुतीत आलबेल नसल्याचे चित्र आहे. डॉ. भामरे यांना पक्षांतर्गत गटबाजी थांबवून महायुतीतील अन्य घटक पक्षांना बरोबर घेण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

महायुतीचे डॉ. भामरे यांना जसा विरोध आहे. तसाच विरोध महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. बच्छाव यांना देखील आहे. पक्षाने डॉ. बच्छाव यांची उमेदवारी जाहीर करताच धुळे व मालेगावमधून त्यांना उघड विरोध झाला. उमेदवारीसाठी इच्छूक असलेले मालेगावचे डॉ. शेवाळे व धुळ्याचे श्याम सनेर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत बच्छावांच्या उमेदवारीला विरोध केला. या विरोधाला डावलून डॉ. बच्छाव दहा, बारा दिवसापासून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांनी काही गावांचा दौरा केला परंतू या दौर्‍यापासून काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी चार हात लांबच राहिले. तर दुसरीकडे काँग्रेस बंडखोर डॉ. शेवाळे हे अपक्ष लढण्याच्या तयारीत असून ते देखील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत उमेदवारी संदर्भात चाचपणी करीत आहेत. त्यामुळे डॉ. शेवाळेंनी उमेदवारी केली तर डॉ. बच्छावांची डोकेदुखी वाढणार आहे. डॉ. बच्छाव यांना डॉ. शेवाळेंबरोबरच पक्षांतर्गत नाराजांची समजूत काढावी लागले. याउलट काँग्रेसमधील नाराजीचा फायदा डॉ. भामरे कशा पध्दतीने करुन घेतात हे पाहणे ही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत